लेखक: Maharashtra katta | तारीख: 04 जानेवारी, 2025

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक झाल्याची माहिती आहे. हे दोन मुख्य आरोपी आहेत. या अटकेनंतर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“आता एक काम सरकारकडून होणं गरजेचं आहे. या सगळ्या आरोपींची नार्को टेस्ट केली पाहिजे. खंडणीच्या आणि हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी दोघांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. सरकारने यात अजिबात हयगय करु नये. कारण यामध्ये मोठं रॅकेट आहे” असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.
“पुण्यातून सगळ्यांना पकडलं जातय याचा अर्थ सरकार आणि सरकारमधील मंत्र्याच प्रचंड राजकीय पाठबळ आहे. यांना कोण संभाळतय, त्यांना सुद्धा सरकारने अटक करावी” अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.
“देशमुख बांधवाची क्रूर पद्धतीने हत्या झाली. आरोपीला संभाळण्यात यांना मोठेपणा वाटतो. हे कोण आहेत? यांना आरोपीला भाकरी द्यावीशी वाटते. आरोपीला संभाळतात. त्यांना ऐशोआराम देतात. आरोपीने कोणाच्या तरी लेकाचा, लेकीच्या बापाचा खून केलाय. तुम्ही त्यांना संभाळताय. सरकारने यांना पाठिशी घालू नये. हे रॅकेटच आहे” — मनोज जरांगे पाटील