स्वप्नं ती नाही जी झोपेत पाहिली जातात, स्वप्नं ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत!” ही उक्ती खरी करून दाखवली आहे कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील यमगे गावच्या बिरदेव सिद्धाप्पा डोणे याने. एक मेंढपाळाचा मुलगा, ज्याच्या घरी सुविधा नव्हत्या, शिक्षणाचं वातावरण नव्हतं, तरीही त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) 2024 च्या परीक्षेत 551 वी रँक मिळवून IPS पदाला गवसणी घातली! डोंगरदऱ्यात मेंढ्या चारणाऱ्या या मुलाने पुण्याच्या COEP ते दिल्लीच्या रस्त्यावर स्वप्नांचा पाठलाग करत इतिहास घडवला. पण या यशामागे आहे कठोर मेहनत, अपयशाचा सामना आणि मित्रांचा आधार! कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे गावात एका साध्या धनगर कुटुंबात बिरदेव चा जन्म झाला. त्याचे वडील सिद्धाप्पा डोणे मेंढपाळ आहेत, तर आई घर सांभाळते. कुटुंबात बिरदेव, भारतीय सैन्यात असलेला त्याचा भाऊ वासुदेव, आणि एक बहीण आहे. घरात फक्त दोन खोल्या, अभ्यासाला जागा नाही, आणि शिक्षणाचं वातावरण तर दूरची गोष्ट! बिरदेवचं बालपण डोंगरदऱ्यांमध्ये मेंढ्या-बकऱ्या चारत आणि उघड्यावर पुस्तकं घेऊन अभ्यास करत गेलं. रात्रीच्या अंधारात तेलाच्या दिव्याच्या उजेडात तो पुस्तकं चाळायचा, गावातील विद्या मंदिर शाळेत प्राथमिक शिक्षण आणि जय महाराष्ट्र हायस्कूल मध्ये माध्यमिक शिक्षण घेताना बिरदेवला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. घरात अभ्यासाला जागा नसल्याने तो गावातील मराठी शाळेच्या व्हरांड्यात बसून अभ्यास करायचा. अन जिद्द या सगळ्या अडचणींवर मात करायची. आजकालच्या काळात खाजगी क्लासचे बाजारीकरण झालेला असताना बिरदेवने कोणताही खाजगी क्लास न लावता दहावीत 96% गुण मिळवून मुरगूड केंद्रात पहिला क्रमांक पटकावला. मुरगूडच्या शिवराज विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज मध्ये बारावीत त्याने 89% गुण मिळवले आणि पुन्हा केंद्रात अव्वल ठरला.बिरदेवच्या याच जिद्द अन चिकाटीने त्याला CET परीक्षेत महाराष्ट्र राज्यात 7 वी रँक मिळवून दिली. यामुळे त्याला पुण्याच्या प्रतिष्ठित कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुणे (COEP) मध्ये सिव्हिल इंजिनीअरिंगला प्रवेश मिळाला. गावातून पुण्यासारख्या मोठ्या शहरात येणं त्याच्यासाठी नवं आव्हान होतं, पण त्याने हार मानली नाही.पण म्हणतात न आयुष्यात तुम्हाला ज्या पद्धतीचे मित्र भेटतात त्यानुसार आपले जीवन घडत जाते. त्याच प्रमाणे बिरदेवळा सुद्धा साथ मिळाली त्याच्या COEP मधील प्रांजल चोपडे आणि अक्षय सोलनकर या मित्रांची.. कॉलेजात काही सिनिअर्स त्याची गावठी राहणी आणि मेंढपाळ कुटुंबाची पार्श्वभूमी यामुळे चेष्टा करायचे, पण दोन वर्षांनी सिनियर असणाऱ्या प्रांजलने त्याला आधार दिला आणि दोघांची मैत्री दृढ झाली.प्रांजलने इंजिनीअरिंगनंतर एक वर्ष नोकरी केली, पण नंतर त्याने UPSC चा मार्ग निवडला. दोन वर्षांपूर्वी प्रांजल UPSC अंतर्गत फॉरेस्ट ऑफिसर म्हणून निवडला गेला. त्याच्या यशाने बिरदेवला प्रेरणा मिळाली.तर अक्षय सोलनकर, यानेही बिरदेवला वेळोवेळी मदत केली. अभ्यासाच्या नोट्सपासून ते मानसिक आधारापर्यंत, अक्षयने बिरदेवला कधी एकटं पडू दिलं नाही. सिविल इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर त्याने ठरवलं आता UPSC ची तयारी करायची! बिरदेवने UPSC ची तयारीला सुरूवात केली खरी पण दिल्लीत जाणं म्हणजे मोठा खर्च—महिन्याला 10-12 हजार रुपये. वडिलांनी त्याला नोकरीचा सल्ला दिला, पण बिरदेवचं स्वप्न होतं IPS होण्याचं! त्याचा भाऊ वासुदेव, जो भारतीय सैन्यात आहे, त्याने आर्थिक जबाबदारी उचलली. बिरदेव दोन वर्षं दिल्लीत राहिला, तिथे छोट्या खोलीत राहून रात्रंदिवस अभ्यास केला. पण पहिल्या दोन प्रयत्नांत अपयश आलं. अपयशाने खचून न जाता बिरदेव पुण्यात परतला आणि सदाशिव पेठेत अभ्यासाला लागला. त्याने नोकरीचा विचार न करता UPSC च्या खडतर मार्गावर पुढे चालणं पसंत केलं. त्याने अभ्यासाची रणनीती बदलली, मागील चुका सुधारल्या, आणि तिसऱ्या प्रयत्नात तयारीला लागला. अपयशाने खचून न जाता बिरदेव पुण्यात परतला आणि सदाशिव पेठेत अभ्यासाला लागला. त्याने नोकरीचा विचार न करता UPSC च्या खडतर मार्गावर पुढे चालणं पसंत केलं. त्याने अभ्यासाची रणनीती बदलली, मागील चुका सुधारल्या, आणि तिसऱ्या प्रयत्नात तयारीला लागला. 2024 मध्ये बिरदेवने पुन्हा परीक्षा दिली. यावेळी त्याची मेहनत रंगली, आणि त्याने देशात 551 वी रँक मिळवली! निकाल जाहीर झाला प्रांजलने यादीत बिरदेवचं नाव शोधलं आणि त्याला फोनवर अभिनंदन केलं. तेव्हा बिरदेव बेळगाव परिसरात मेंढ्या चारत होता.“तू का मेंढ्या घेऊन गेलास?” असं विचारल्यावर बिरदेव म्हणाला, “बाबा आजारी आहेत, त्यामुळे मीच सध्या बकऱ्या चारतोय!” मधल्या काळात बिरदेवच्या वडिलांना किडनीच्या मुतखड्याचं ऑपरेशन करावं लागलं. घरात पैशांची चणचण होती, आणि ऑपरेशननंतर काही गुंतागुंत झालेली बिरदेवने प्रांजल आणि कोल्हापूरचा मित्र आशिष पाटील (IAS) यांच्याकडे मदत मागितली. आशिषच्या ओळखीने कोल्हापूरच्या खासगी मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झालं. प्रांजल आणि आशिषने केवळ आर्थिकच नव्हे, तर मानसिक आधारही दिला. “बिरदेव, तू फक्त अभ्यासावर लक्ष दे, आम्ही बाकी सांभाळतो!” असं सांगत त्यांनी बिरदेवला धीर दिलेला. तसेच काही दिवसांपूर्वी बिरदेवचा मोबाइल पुण्यात हरवला. तो पोलिस स्टेशनला तक्रार द्यायला गेला, पण पोलिसांनी तक्रार नोंदवायला टाळाटाळ केली. बिरदेवने प्रशिक्षणात असलेल्या मित्रांच्या मदतीने अखेर तक्रार नोंदवली, पण पोलिसांनी “तपास चालू आहे, सापडला की कळवू” असं ठराविक उत्तर दिलं. फोन अजून सापडला नाही, पण हाच बिरदेव आता भारतीय पोलीस सेवेच्या (IPS) सर्वोच्च पदासाठी निवडला गेला आहे! हे विशेष! बिरदेवच्या यशाने यमगे गावात आनंदाचं वातावरण निर्माण झाले आहे. निकालानंतर बिरदेव बेळगावात मेंढ्या चारत असताना गावकऱ्यांनी तिथे जाऊन त्याला धनगरी पगडी घालून सन्मानित केलं. “आमच्या गावाचा मुलगा IPS होतोय, यापेक्षा मोठा अभिमान काय?” असं गावकरी सांगतात. धनगर समाजातील एका मेंढपाळाच्या मुलाने इतकं मोठं यश मिळवल्याने समाजात अभिमानाचं वातावरण आहे. “बिरदेवने दाखवून दिलं की, परिस्थिती कितीही वाईट असली, तरी मेहनत आणि जिद्दीने यश मिळतंच! असं गावकऱ्यांचे म्हणणे आहे. डोंगरदऱ्यात मेंढ्या चारणाऱ्या मुलाने थेट IPS पदापर्यंत मजल मारली, ही गोष्ट प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. कागल तालुक्यातून UPSC मध्ये इतकं यश मिळवणारा बिरदेव हा एकमेव विद्यार्थी आहे. त्याने संपूर्ण तालुक्याचाच नाही तर महाराष्ट्राचा मान वाढवला आहे. त्याच्या या यशाला महाराष्ट्र कट्ट्याचा सलाम… PSL प्रसारणावर बंदी, पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला भारताचा मोठा झटका