Delhi India आजच्या बातम्या ताज्या बातम्या

BJP ने खरंच Manmohan Singh यांचा अपमान केला?

राजघाट नाहीतर निगमबोध घाटावर भारताचे माजी पंतप्रधान, अर्थतज्ज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर त्यांचे अंत्य संस्कार करण्यात आल्याने अंत्य संस्कारां वेळी भाजप सरकारकडून त्यांचा अपमान करण्यात आला असे आरोप होत असताना डॉक्टर मनमोहन सिंग यांना राजघाट का नाकारण्यात आला असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. म्हणूनच भाजप सरकारने खरंच डॉक्टर मनमोहन सिंग यांचा अपमान केला का? सरकारच्या कोणत्या कृत्यांमुळे त्यांचा अपमान झाला? आणि यावर भाजपा व काँग्रेसने नेमकी कोणती भूमीका घेतली आहे तेच जाणून घेऊयात अर्थतज्ज्ञ व २००४ ते २०१४ पर्यंत भारताचे पंतप्रधान राहिलेले डॉ. मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी २६ डिसेंबर २०२४ रोजी उशिरा रात्री दिल्लीतील एम्स येथे निधन झाले होते. २८ डिसेंबरला निगमबोध घाटावर पूर्ण सन्मानाने, शासकीय इतमामात त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी अंत्यसंस्काराच्या जागेची निवड हि डॉ. मनमोहन सिंग यांचा “अपमान” आहे असं म्हटलंय. “भारतमातेचे महान सुपुत्र आणि शीख समुदायाचे पहिले पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करून सध्याच्या सरकारने त्यांचा पूर्णपणे अपमान केला आहे. ते एक दशक भारताचे पंतप्रधान होते, त्यांच्या कार्यकाळात देश आर्थिक महासत्ता बनला आणि त्यांची धोरणे अजूनही देशातील गरीब आणि मागासवर्गीयांना आधार देतात, आजपर्यंत, सर्व माजी पंतप्रधानांच्या प्रतिष्ठेचा आदर करून, त्यांचे अंत्यसंस्कार राजघाट येथे करण्यात आले जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला अंतिम ‘दर्शन’ घेता येईल आणि कोणत्याही गैरसोयीशिवाय श्रद्धांजली वाहता येईल. डॉ. मनमोहन सिंग हे आपल्या सर्वोच्च आदराचे आणि स्मारकाचे पात्र आहेत. सरकारने देशाच्या या महान सुपुत्राचा आणि त्यांच्या अभिमानी समुदायाचा आदर करायला हवा होता,” असं राहुल गांधी या प्रकाराबाबत बोलताना म्हणाले. डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे माजी पंतप्रधान होते. त्याप्रमाणे त्यांचे अंत्यसंस्कार दिल्लीतील राजघाट येथे होण व त्यासोबतच राजघाट येथे अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं स्मारक उभारणं अपेक्षित होत, मात्र असं काहीही झालं नाही. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे अंत्यसंस्कार राजघाट ऐवजी निगमबोध घाटावर करण्यात आले. तर त्यांच्या स्मारकासाठी कोणतीही जागा तातडीने उपलब्ध करून न देता, दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी योग्य जागा शोधण्यात येईल व तेथे त्यांचे स्मारक उभारले जाईल असं सरकारने म्हटले आहे. यासोबतच मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारांचे थेट प्रक्षेपण देखील कोणत्याही शासकीय वाहिनी कडून करण्यात आले नव्हते. परिणामी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर त्यांना या प्रकारची दुय्यम वागणूक देऊन सरकार ने डॉक्टर मनमोहन सिंग यांचा अपमान केला आहे असा आरोप अनेक जण करत असून, या मुद्द्यावरून अनेकांनी सरकारवर टीका देखील केली आहे. या सगळ्या आरोपांनंतर भाजपची बाजू मांडताना गौरव भाटिया यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. “भारताचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांचे अंत्यसंस्कार दिल्लीत का झाले नाहीत? त्यांचे अंत्यसंस्कार त्यांच्या मूळ शहरात करण्यास कोणी सांगितले होते. काँग्रेसने नरसिंहराव यांच्यासाठी नेमके कुठे स्मारक बांधले आहे? त्या स्मारकाचा पत्ता कृपा करून आम्हाला द्यावा. आपण श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र तिथे जाऊ” असं म्हणत काँग्रेसच्या काळात पी व्ही नरसिंहराव यांच्यावर झालेल्या अन्यायाचा दाखला देत डॉक्टर मनमोहन सिंग यांना दिलेल्या वागणुकीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न गौरव भाटिया यांनी केला आहे. जवळपास एक दशक भारताचे पंतप्रधान राहिलेले, व शीख समुदायाचे एकमेव पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना मिळालेली एकूणच हि वागणूक अतिशय खेद जनक असून यावर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. तर तुम्हाला काय वाटतं, खरंच डॉक्टर मनमोहन सिंग यांचा अपमान झाला का? यावर तुमचे मत काय ते कंमेंट करून नक्की सांगा. भारताचे माजी पंतप्रधान, अर्थतज्ज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांना महाराष्ट्र कट्ट्याच्या संपूर्ण टीम कडून भावपूर्ण श्राद्धांजली.

Kothrud Pune आजच्या बातम्या

जागा मोकळी करण्याची पालिकेने बजावली सोसायटीला नोटीस.-

कोथरूड परिसरातील उजवी भुसारी कॉलनी येथील ईशाना सोसायटीमध्ये सर्व्हे नं. ७७/२ येथे पालिकेची १०७१.७७ चौ.मी जागा असून सदर ठिकाणी अतिक्रमण केले होते. पालिकेच्या ताब्यात जागा असून तसा पालिकेने फलक देखील लावलेला आहे. परंतू जागेच्या सुरक्षेबाबत कोणतीच उपाययोजना न केल्याने येथे अतिक्रमण केले असल्याचे दिसून येते. याबाबत बातम्या.इन ने वृत्त प्रसिध्द करताच पालिकेने सोसायटीला नोटीस बजावली असून जागा मोकळी करण्याचे आदेश दिले आहेत. जागेचे भाव वाढत असून गगनाला भिडले आहेत. कोथरूडमधील उजवी भुसारी कॉलनी येथे ईशाना सोसायटी आवारात असलेली १०७१.७७ चौ.मी म्हणजे साधारण ११ गुंठे जागा पालिकेच्या ताब्यात आहे. मोठी जागा असून लोकाभिमुख प्रकल्प चांगलाच विकसित होऊ शकतो. परंतू सध्या येथे वाहने पार्किंग होत असून तसेच जागेला सुरक्षाभिंत नसल्याने जागा नेमकी कुठून सुरू होते आणि कुठे संपते हे समजणे कठीण आहे. खाजगी बांधकाम व्यावसायिक येथे पुनर्विकास करण्याचे काम सुरू करत असून पालिकेची जागा सोसायटीच्या जागेमध्ये समाविष्ट करत त्यांनीच हे पत्र लावले आहेत अशी चर्चा कोथरूड परिसरात रंगली आहे.सदर जागेबाबत वृत्त प्रसिद्ध होताच पालिका मालमत्ता व्यवस्थापन विभाग खडबडून जागे होत. मालमत्ता व्यवस्थापन विभागाने ईशाना -३ सोसायटीचे चेअरमन यांना नोटीस बजावली असून स.नं ७७/२ या ठिकाणी अमिनिटी स्पेस/जागा पुणे महानगर पालिकेच्या मालकीची जागा तात्काळ मोकळी करून द्यावी असा आदेश देण्यात आला आहे. सदर जागा मोकळी केली नाही तर आपल्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे. पुणे शहराचे भाजयुमो सरचिटणीस दुष्यंत मोहोळ म्हणाले की, चांदणी चौकापासून जवळच असलेल्या उजवी भुसारी कॉलनी येथे दहा गुंठे जागा असून सदर जागा पालिकेच्या ताब्यात देखील आहे. शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या पाहता पालिकेच्या सुविधा वाढविणे आवश्यक आहे. सदर जागेवर नागरिकांच्या हितासाठी चांगला प्रकल्प किंवा वास्तू उभारता येऊ शकते. पालिकेच्या जागेला सुरक्षाभिंत असणे आवश्यक आहे, ती असली असती तर अतिक्रमण झाले नसते. पालिकेकडे सुरक्षाभिंत बांधण्यासाठी पैसे नसतील तर आम्ही लोकवर्गणी गोळा करून पालिकेकडे सुरक्षा भिंत उभारण्यासाठी निधी देऊ.